Tuesday, December 3, 2019

नि:शब्द...

नि:शब्द...

घटना क्र.1).दिल्ली. 16 डिसेंबर 201213. दक्षिण दिल्लीत रहाणार्‍या एका युवतीचा (निर्भया) चालत्या बसमध्ये राम सिंग, मुकेश सिंग, विनय शर्मा, महम्मद अफरोज, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर या सहा नराधमांनी पाशवी बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला चालत्या बसमधूनच फेकून दिले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. तर मित्र गंभीर जखमी झाला.
घटना क्र.2). महाराष्ट्र. 13 जुलै 2016. कोपर्डीत राहणार्‍या 15 वर्षांच्या एका मुलीची जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली.
घटना क्र. 3). जम्मू काश्मीर. 10-17 जानेवारी 2018. कठुआ येथील एका आठ वर्षाच्या  मुलीचे अपहरण करून आरोपी पुजारी, पोलिस अधिकारी, पोलिस शिपाई, पुजार्‍याचा मुलगा आणि नातवाने तिचे आठवडाभर शरीराचे लचके तोडले आणि शेवटी तिचा खून केला.
घटना क्र. 4). तेलंगणा.  गुरुवार 28 नोव्हेंबर 2019. रोजीच्या रात्री हैद्राबादजवळील शमशाबाद टोल नाक्यावर आरोपी  महम्मद अरिफ(चालक), जोल्लू नवीन (क्लिनर), चेन्नाकेशवलू (चालक) आणि जोल्लू शिवा (क्लिनर) यांनी प्रियांका रेड्डी नामक एका पशुवैद्यक असलेल्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह पेटवून दिला.
या चारही घटनांचा इतिहास पाहिला तर तो वाचून अंगावर काटा आणणारा आहे.  म्हणूनच या घटना घडल्यानंतर सारा देश हादरवून सोडला आहे, कारण बळी पडले दुर्दैवी हे विविध जाती धर्मातील असून स्त्री ही त्यातली समान बाब आहे. आणि त्यातल्या बळी या आपल्याच मुली -बहिणी  आहेत आणि आपल्याच समाजातील आहेत. तर गुन्हेगारही एकाच ठरावीक जातीतले नसून ते एका समान पाशवी मानसिकतेतले आहेत. हे इथे उल्लेख करण्यासारखे आहे. या घटनेने आजचा समाज खरोखर ‘नि:शब्द’ झालेला आहे. जिथे परस्रीला मातेसमान, देवीसमान मानण्याची संस्कृती असणार्‍या आपल्या लोकशाहीच्या देशात अशा घृणास्पद घटना घडतात तेव्हा मनातील विचार लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटवताना आपले शब्द जागच्या जागी थिजल्यासारखे वाटतात आणि लेखणी अबोल झाल्यासारखी भासते.
निर्भया,कोपर्डी,कठुआ,आणि आता घडलेली ही घटना संपूर्ण मानवजातीला धिक्कार करायला लावून अबोल बनवते. समाजात प्रचंड आक्रोश आहे. कॅण्डल मार्च, निदर्शने काढली जाताहेत. समाजमाध्यमे, दुरचित्रवाणी, आकाशवाणी व वृत्तपत्रात याचा निषेध व्यक्त करीत प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारत आहेत. या घटनांची चर्चा होते आणि होत रहाणार. मग प्रश्न येतो तो आपण महिलांचे  सक्षमिकरण केले, त्या सक्षम होताहेत, त्या सबला बनताहेत याचा. हेच का ते? मुली,महिला शिकल्या,साक्षर झाल्या, नोकरी, व्यवसाय, उद्योग करू लागल्या. मानाची पदे भूषवू लागल्या. यामुळे वैचारिक पातळीत बदल झाला. चूल आणि मूल ही संकल्पना मागे पडून त्या दखलपात्र झाल्या. या निमित्ताने त्या वेळीअवेळी घराबाहेर राहू लागल्या. आर्थिक सुबत्ता आली. त्या आत्मनिर्भर झाल्या. जागतिकीकरणाची कवाडे उघडल्याने जग मोकळे झाले. आपल्या देशानेही त्याचा स्विकार केला. मग असे असेल तर त्या ‘या’ समाजात वावरताना सुरक्षित आहेत का? नसतील तर या बदलाचा उपयोग काय, अशा विचार मनात येतो. रात्री अपरात्री त्या कामावरून घरी परत येत असताना अशा हिंस्त्र घटना घडत असतील तर महिला सबलीकरणाच्या बाता मारणारे आपण नि:शब्द व्हायचे का? आता पोलीस,कायदा प्रशासन त्यांचे काम करेल. आरोपींना कायद्याने आहे ती शिक्षा,दंड होईल. पण ही वरवरची मलमपट्टी नाही का? ह्या घटना थांबणार कधी? यावर कायमस्वरूपी उपाययोजना नाही का? याचे उत्तर याच्या मुळाशी गेल्याशिवाय मिळणार नाहीत. ते कायद्याच्या दृष्टीने किंवा सामाजिक स्तरावर शोधून मिळेल.
मनुष्याच्या जडणघडणीत वैयक्तिक व सामाजिक संस्काराचा खुप मोठा वाटा असतो. आपल्या संस्कृतीनुसार आपली जडणघडण होते.
आधुनिकीकरणाच्या लाटेत तंत्रज्ञान आले. सामाजिक जीवनमान उंचावले. मनोरंजन,संदेशांची देवाणघेवाण यांनी समाजाचे रुप पालटले.पण हेच तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे विध्वंसही करू लागले आहे. त्याच्या वापराने जीवनमान सुसह्य झाले,उंचावले पण दुसरीकडे त्याच्या अतीवापरावर नियंत्रण सुटले. त्यावर कुणाचाही वचक राहिला नाही. सुरवातीला कुतुहल वाटणार्‍या गोष्टी सवयीची झाल्या. समाज या लाटेवर स्वार होऊन चौफेर उधळू लागला. बेफीकीर झाला.
मानसशास्त्र सांगते कि एखादी आकर्षक गोष्टीचे चित्रण तुमच्यासमोर वारंवार झाले तर त्या गोष्टीबद्दल तसेच मत तयार होऊ लागते. त्याबद्दल जाणून घेण्याची वृत्ती निर्माण होते. मग त्या माध्यमांमधील जाहिरातीतील असो वा चित्रपटांमधून दाखवलेले अश्लील हावभाव किंवा चित्रण असो. अशा व्यक्त न होणार्‍या गोष्टींचे दृष्यरूप जर समोर आले तर मेंदू बधीर होऊन जातो. मग याचा अतिरेक झाला तर सद्सद्विवेकबुद्धी गहाण पडून मग बेशुध्द पडलेला आपला पशू मेंदू आळस झटकत जागा होतो. नि मग संंधीची वाट पहायला लागतो. मग असे आभासी दुनियेतले चित्ररूप आपली मानवी मेंदू वास्तवात ते खरे समजून मग संधी मिळेल तिथे त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. अगदी प्रत्येकाच्या घराघरात दिवसभर असे विषारी खाद्य दुर्दैवाने या ना त्या प्रकारे आज सहज उपलब्ध होतेय. चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिराती इत्यादींच्या माध्यमातून याचा सतत भडीमार चालू असतो. यावर समाज,सरकार,पोलीस प्रशासनाने अंकुश लावण्याचा प्रयत्न केला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पळवाटा शोधून त्यांना वेड्यात काढले जाते.
पण आपण हे विसरतोय की अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळेच आपण बेभान होतोय. त्यामुळेच व्यभिचार वाढतोय. दुसर्‍याकडे आहे ते माझ्याकडे नाही ह्या भावनेतून असुया, तिरस्कार वाढतोय. गुन्हा घडल्यानंतर शिक्षा होण्यास होणारा विलंबामुळे कायद्याचा धाक कमी झालाय. ‘काही केले तरी फरक पडत नाही’ या बेपर्वाही भावनेमुळे गुन्हेगारांची भीड चेपते आणि पुढे तो मोठा गुन्हा करण्यासाठी सहज तयार होतो. यात दोन गोष्टी होतात. एक ठरवून केलेला गुन्हा आणि दुसरा नकळतपणे हातून घडलेला गुन्हा. 
म्हणूनच आधी वाहत चाललेल्या सोशल मीडियाच्या वापरावर सप्रमाण बंधने आणायला हवीत. सेन्सॉरने कडक नियमांची अंमलबजावणी करायला हवी.  झालेल्या गुन्ह्यात तात्काळ जबर शिक्षेची कार्यवाही व्हायला हवी. कारण उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो. कायद्यातल्या पळवाटा काढून टाकून अशा गुन्ह्यात जबर शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी केली तरच समाजात प्रभावी संदेश जाऊन अशा उधळलेल्यांना अंकुश बसेल. यासाठी शालेय स्तरावर मूल्यशिक्षणावर भर द्यायला हवा. समाज माध्यमांच्या वापराबरोबरच समाज जागरूकता पटवून द्यायला हवी. तरच येणारी पिढी सुसंस्कारिक,सजग,सशक्त,सामाजिक भान असणारी बनवताना पुन्हा पुन्हा ‘नि:शब्द’ व्हायची वेळ येणार नाही.
- मारुती वि. पाटील
पवारांच्या भिजण्याने
भाजपला रडवले!

गुरूवार, दि. 24 ऑक्टोबर 2019

सातार्‍याच्या जिल्हा परिषद मैदानावर गेल्या शुक्रवारी 18 ऑक्टोबरला रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण करत प्रचाराची सांगता केली. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. प्रचारसभा दरवेळीप्रमाणे यंदाही झाल्या. या निवडणुकीतली सातार्‍यात झालेल्या सभेची मात्र इतिहासात नोंद झाली.
गेल्या 5 वर्षांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जणू आळसावलेल्या मनस्थितीत होता. यापक्षांना जणू मळभच चढलेली होती. पण तरीही अशा वातावरणात शरद पवार नावाच्या 80 वर्षांच्या उमद्या म्हातार्‍याने तरूणांना लाजवेल अशी पक्षनेतृत्वाची धुरा हातात घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सोलापूरच्या पंढरपूर आाणि बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत सकाळी सभा घेतली आणि संध्याकाळी पवारसाहेब सातार्‍यात दाखल झाले. तोपर्यंत सातार्‍याचं जिल्हा परिषदेचं मैदान पवारांना ऐकायला सज्ज झालं होतं.
जिल्हा परिषदेचं मैदान खच्चाखच भरलं होतं. पवार बोलायला उभं राहिले. आणि थोड्याचवेळात पाऊसही पवारसाहेब काय बोलतात ते ऐकायला आला. लोकांना वाटलं पवार आटोपतं घेतील आणि निघून जातील. ऐकायला आलेल्या अनेकांनी आडोसा धरायला सुरवात केली. पण भर पावसात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आपलं झंझावती भाषण सुरुच ठेवलं.  पवार पावसातच भाषण करताहेत, हे पाहून लोक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखीनच उत्साहीत झाले. बघता बघता आडोसा घेतलेल्यांनीही आडोसा सोडला. आणि तेही यात सामील झाले. टाळ्या, शिट्ट्यांनी सारा परिसर दणाणत होता. भर पावसात हा 80 वर्षांचा म्हातारा, पायाला गंभीर जखम झालेली असतानाही, लोकांशी बोलत होता... ही थोरच गोष्ट आहे. त्यांचा निवडणुकीतला असा उत्साह पहाताना अर्नेस्ट हिमिंगवेच्या ‘द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ या कादंबरीची राहून राहून आठवण येते.
पवारांची कुठलीही राजकीय खेळी सगळ्यांनाच पेचात टाकणारी असते. हे अवघा महाराष्ट्र नव्हे देशही जाणून आहे. त्यामुळेच त्यांच्या या भर पावसात केलेल्या भाषणानंही जनतेला पेचात टाकले. आणि लागलीच पवारांनी भर पावसात भाषण केल्याचा विडिओ, फोटो वार्‍याहून अधिक वेगाने वायरल झाले.
भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. विशेष म्हणजे तरुण पिढीने पवारांच्या पावसातील भाषणाला उत्स्फूर्त दाद दिली. जणू नवऊर्जाच मिळाली होती. याचा नाही म्हटलं तरी परिणाम मतांवरही झाला. पण तो परिणाम प्रत्येक भागातून कमीअधिक प्रमाणात दिसून आला.
राष्ट्रवादीवर पश्चिम महाराष्ट्रात बराच राग होता. सत्तेत असताना पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादीनं अन्याय केल्याची भावना होती. चीड होती. मतदार संतापले होते. पण पवारांच्या पावसातल्या भाषणामुळे एक प्रकारची सहानुभुती मिळवण्यात पवार यशस्वी झालेत. इतकंच नाही, तर राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देणार्‍यांनीच पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला होता, असं बिंबवण्यातही पवार यशस्वी झाले.
पवार पावसात भिजल्याचे फोटो सोशल मीडियात एका रात्रीत वणव्यासारखे पसरले. त्यांच्यावर लोक लिहू लागले. त्यांची स्तुती करु लागले. याचा अर्थ तरुणांना आकर्षित करण्यात पवार यशस्वी झाले, असाच आहे.
तुम्हाला आठवतंय, पश्चिम महाराष्ट्राला महापुरानं वेढा घातल्यानंतर लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हाही पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते. ज्या वेगाने पावसात भिजल्याचे पवारांचे फोटो शेअर झाले, पण त्या वेगाने पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतरचे फोटो वायरल झाले नव्हते.
पण पवारांव्यतिरिक्त कुणीही नेता पूराने वेढा घातला तेव्हा पूरग्रस्तांच्या मदतीला येवढ्या तत्परतेने धावून आला नव्हता. आले ते पवारांनंतर. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा इतर कुठल्या नेत्यानं पवारांसारखा प्रयत्न केला नाही, असं लोकच बोलताना सांगताना दिसतात.
पूरस्थितीला मोदी आले नाहीत आणि मतं मात्र मागायला मोदी आले, असा उलट टोला लोकांकडून हाणला गेला. यातूनही हेच स्पष्ट झालं, की पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आणि सोशल मीडियात आपली दखल घ्यायला भाग पाडलं. तिथे पवार जिंकले.
पश्चिम महाराष्ट्र किंवा एकूण महाराष्ट्रात रयतेचा राजा ही शिवाजी महाराजांची ओळख आपल्यालाही मिळावी, यासाठी प्रत्येक नेता प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. ‘उदयनराजे भोसलेंना तिकीट देऊन चूक केली’, असा कबुलीनामा देणारे शरद पवार राजा, प्रजा आणि रयतेमधला राजा बनण्यासाठी लोकांची तशी दृष्टी तयार करण्यात यशस्वी झालेले दिसताहेत. सत्तेचं सारं वलय असलेल्या मोदी आणि शहांच्या प्रभावापुढे माध्यमांना आपली दखल घेण्यासाठी भाग पाडण्यातही त्यांना यश आलं.
नरेंद्र मोदींच्या सभा तासनतास लाईव्ह दाखवणार्‍या टीव्ही चॅनेलच्या भाऊगर्दीत शरद पवार भाव खावून गेले.
कलम 370, आरे बचाव, राज्यातील महापूर हे विषय विरोधकांनी उचलले. मात्र यामधे पीएमसी बँक खातेधारकांचा विषय जास्त युतीला त्रास देवून गेला, असं जाणकार सांगतात.
80 वर्षांचा एक म्हातारा पावसात भाषण करतो, ही महाराष्ट्राच्या राजकारणतली मोठी गोष्ट आहेच. कॅन्सरशी दोन हात केलेल्या माणसांने कशाचीही पर्वा न करता, उभा महाराष्ट्र पालथा घालणं, हे अन्य कुठल्या नेत्याला जमल्याचं आपल्या नजीकच्या इतिहासात कुठलं उदाहरण नाही, हे नमूद करायला हवं.
निवडणुकीच्या काळात फडणवीसांची महाजनादेश, आदित्य यांची जनाशिर्वाद , मग राज ठाकरेंचा दोन किंवा फार फार तर चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा, हे पवारांपुढे दुय्यमच ठरलेत. ही लढाईदेखील पवार खर्‍या अर्थाने जिंकलेत.भलेही निवडणुकीत युतीचे सरकार जिंकलेले असले तरी.
सध्याची राष्ट्रवादीची स्थिती भाजपची सत्ता उलथवून टाकू शकत नाही, हे पवारांनाही माहीत आहेच. पण पवारांची येणारी पिढी भाजपला नक्कीच आव्हान देऊ शकते, हे यावरून दिसून येते. कारण शरद पवारांच्या पावसात भिजत केलेल्या भाषणाची प्रेरणा राष्ट्रवादीला नेहमी जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी ठरणार आहे.
(मारुती वि. पाटील)